विशेष लेख : हे कसले उत्सव?
लोकसत्ता , सोमवार, १३ ऑगस्ट २०१२
टिनपाट राजकारणी आणि शब्दश:
दीडदमडीसाठी वाटेल ते करायला तयार असलेल्या भुक्कड तारे तारका यामुळे आपल्याकडील
उत्सवांना जे बाजारू स्वरूप आले आहे, ते पाहता कोणाही विचारी
माणसास शिसारीच येईल. शुक्रवारी दहीहंडीच्या निमित्ताने जे काही साजरे झाले
त्यावरून याचा प्रत्यय यावा. या सण साजरे करण्याच्या वृत्तीचे वर्णन हुल्लडबाजी
यापेक्षा वेगळे करता येणार नाही. गोपाळकाल्याच्या या कथित उत्सवांत किमान तीन तरुण
हकनाक मेले आहेत आणि साडेतीनशेच्याही वर जायबंदी झाले आहेत.
जे गेले त्यांच्या आईवडिलांचे
वा अन्य कुटुंबीयांचे काय पाप? असल्या उन्मादापासून लांब राहायचे असते, याची शिकवण आपल्या पोरास न
दिल्याची शिक्षा या पालकांनी किती भोगायची? जे हा उन्माद तयार करतात, साजरा करतात त्यांच्या अंगावर
ओरखडाही उमटत नाही आणि त्यात वाहून जात आपण आयुष्यभराचे नुकसान करून घेत आहोत याची
या निर्बुद्धतेच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या तरुणांना जाणीवही कशी होत नाही, हा प्रश्न आहे. गेल्या
वर्षीच्या दहीहंडीत असाच एक तरुण जन्माचा जायबंदी झाला आणि घरातील एकमेव कमावता
असल्याने त्याच्या वृद्ध आईवडिलांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. अशा क्षुद्र आनंदासाठी
पोटचा पोरगा कायमचा अपंग झालेला पाहणे यापेक्षा अधिक वेदनादायी त्या वृद्धांसाठी
काय असेल? जेथे
जखमी होतात तेथील मंडळ वा त्यामागचा संस्थानिक राजकारणी या पोरांच्या कलेवरावर
लाख-दोन लाख भिरकावतो. परंतु त्यामुळे आपले नुकसान भरून येणार आहे का, हे त्याच्या मागे
वाचलेल्यांना लक्षात तरी येते काय? बेभान होऊन सण साजरे करताना
प्राण गेलेल्याच्या देहावर आताही काहींनी लाखभराचा दौलतजादा केला. परंतु ज्या
पालकांनी पोटचा पोरगा, एखाद्या
नवपरिणीत तरुणीने आपला साथीदार, एखाद्या बहिणीने आपला एकमेव भाऊ गमावला असेल तो या
लाखभराच्या दौलतजाद्याने परत येणार आहे काय? आणि या दौलतजाद्यासाठी या
मंडळीकडे पैसे येतात कोठून, याचा
तरी विचार त्याच्यामागे धावणारे करतात काय? सध्या साऱ्या जगाला मंदीने
ग्रासले आहे. नोकऱ्या आहेत त्यांना त्या राहतील की नाही ही चिंता आहे आणि ज्यांना
नाहीत त्यांना त्या मिळायची शक्यता अधिकच धूसर झालेली आहे. हातांना काम नाही, बँकांना ग्राहक नाही आणि
उद्योगात गुंतवणूक नाही अशी परिस्थिती असताना हा उत्सवांचा धंदा कसा काय सुरळीत
राहू शकतो? तसा तो
राहतो याचे साधे कारण असे की मोठे उदात्त नाव घेऊन चालवल्या जाणाऱ्या या उत्सवी
संस्था वा संघटना प्रत्यक्षात खंडणीखोरी करतात हे आहे. आजमितीला दुसऱ्या दर्जाचे
राजकारण करणाऱ्या अनेक राजकारण्यांच्या स्वतंत्र अशा संघटना आहेत. या संघटनांच्या
जोरावर आपल्या कार्यक्षेत्राच्या आसपास दंडेली करता येते आणि त्याच दंडेलीच्या
जोरावर आपले राजकीय स्थान अधिक बळकट करता येते, हे अनेक राजकारण्यांच्या
उदाहरणांवरून दाखवून देता येईल. समाजसेवा असे भंपक कारण दाखवीत ही मंडळी राजकारणात
येतात तेव्हा त्या सेवेसाठी वास्तविक त्यांना त्यांचा राजकीय पक्ष असतो. समाजाचे
जे काही भले करायचे ते त्याच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून करण्याची सोय असते.
परंतु यांची उद्दिष्टे मोठी असल्यामुळे राजकीय पक्षांतील जागा या मंडळींना कमी पडत
असावी. त्यामुळे यांच्याकडून स्वतंत्र संघटनांचे दुकान मांडले जाते कारण
त्यानिमित्ताने खंडणीखोरी करता येते. आज आपले अनेक उत्सव हे या खंडणीखोरांकडूनच
चालवले जातात. मग ते गणेशोत्सव असो वा दहीहंडी.
शुक्रवारी जे काही पाहायला
मिळाले ते या खंडणीखोरीचे दृश्यरूप होते. अंगात गल्लीशिवाय ज्यास कोठेही किंमत
नाही अशा कोणा राजकारण्याची छबी असलेले बनियन आणि डोक्यावर पट्टय़ा बांधून युद्धभूमीवर
निघाल्यासारख्या आवेशात रिकामटेकडय़ा तरुणांच्या टोळय़ा शुक्रवारी सकाळपासूनच
हिंडताना दिसत होत्या. ट्रक वा बसमधून, दुचाकींवरून जाताना
येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहत अर्वाच्य हातवारे केले जात होते. आधीच आपल्याकडे
वाहतुकीच्या नियमपालनाची बोंब. त्यात अशा उन्मादी उत्सवाच्या दिवशी तर वाहतुकीचेच
काय, पण
कोणतेच नियम आपणाला लागू होत नाहीत, असे या मंडळींचे वर्तन असते.
राज्यातील अनेक शहरांत शुक्रवारी हेच दृश्य होते. या मंडळींच्या मुखी गोविंदा रे
गोपाला वगैरे होते तरी तो गोविंद त्यांच्या वाऱ्यालाही थांबणार नाही हे सहज
कळण्यासारखे होते आणि त्यांचा गोपालांशी काही सुतराम संबंध नाही, हेही लक्षात येत होते.
उत्सवाच्या काळात समाजात एक उत्साहाचे वातावरण असते आणि माणसांची मने उत्फुल्ल
असतात. परंतु गेली काही वर्षे आपल्याकडे उत्सवांनी जे वळण घेतले आहे ते पाहता असे
म्हणता येणार नाही. आज उत्सवाच्या काळात सभ्य मंडळींना जीव मुठीत धरून राहावे
लागते, ही
परिस्थिती आहे. या सगळय़ा काळात सामान्य माणूस सतत दहशतीखालीच असतो कारण
सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असलेल्या आयोजकांच्या दंडेलीने सामान्यांचा आवाज कधीच
आवळून टाकलेला आहे. वास्तविक अशा वेळी प्रसारमाध्यमांनी आपले भान हरपू न देणे
गरजेचे असते. या कथित उत्सव आयोजकांच्या झुंडशाहीने सामान्यांना दैनंदिन जगणेही
कसे अवघड झाले आहे, याचे
चित्रण माध्यमांनी करायला हवे. परंतु ही प्रसारमाध्यमे फक्त टीआरपीच्या मागे
असतात. त्यामुळे जेथे गर्दी तेथे राजकारणी आणि तेथे प्रसारमाध्यमे असे घडताना
दिसते. समाजविघातक वृत्तींचे कान उपटणे ही आपली प्राथमिक जबाबदारी विसरून
प्रसारमाध्यमे ही या समाजविघातक मंडळींच्या तालावर नाचू लागली आहेत हे चांगले
लक्षण मानता येणार नाही. आधी ही माध्यमे या कथित उत्सवांसाठी हवा तयार करतात, उन्माद शिगेला कसा पोहोचेल हे
पाहतात. आणि नंतर पुन्हा त्या उन्मादात बळी पडलेल्यांच्या हृदयद्रावक कहाण्या
सांगायला हीच मंडळी रिकामी. आता जे या सगळय़ास जबाबदार असतील तेच या जखमींना वा
मृतांना सरकारने मदत द्यावी अशी मागणी करू लागतील आणि प्रसारमाध्यमेही त्यांच्या
सुरात सूर मिसळतील. सत्ताधाऱ्यांशी असलेल्या लागेबांध्यामुळे त्यांना ही मंडळी मदत
मिळवून देतीलही. तेव्हा पुन्हा माध्यमे या मंडळींचे गुणगान गाण्यात आघाडीवर असतील.
वास्तविक उत्सवांच्या उन्मादी दंग्यात केवळ बेजबाबदारपणामुळे प्राण गमावल्यास
त्याची जबाबदारी सरकारने का घ्यावी? हे अपघात म्हणजे काही
नैसर्गिक आपत्ती नाही. किंवा देशासाठी वा समाजासाठी लढताना यांचे प्राण गेले असेही
नाही. तरीही भावनेचा खेळ करीत प्रामाणिक करदात्यांचा पैसा या असल्या बेजबाबदार
कारणांसाठी खर्च करण्यात या मंडळींना काही वाटत नाही आणि सरकारही यांच्याच हाती
असल्याने त्यात परस्पर हितसंबंध आनंदाने पाळलेही जातात. सरकारलाही तेवढेच काही
सांस्कृतिक आणि धर्मार्थ कार्य केल्याचे समाधान.
हे सगळेच उबग आणणारे आहे.
पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राची ही वाटचाल काळजी वाटावी इतक्या झपाटय़ाने
विरुद्ध दिशेला सुरू आहे. यात काही बदल होईल अशी अपेक्षा सत्ताधीशांकडून करण्यात
काहीच अर्थ नाही. हे कसले उत्सव, असा प्रश्न सुजाणांना पडू लागला तरच काही आशा आहे.
|